मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण दोन जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. भाजपने उमरेड (अनुसूचित जाती) आणि मीरा भाईंदर या दोन जागांचा चौथ्या यादीत समावेश केला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड या जागेसाठी भाजपाने सुधीर पारवे यांना तिकीट दिले आहे. तर मीरा भाईंदर या जागेसाठी नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. ज्या जागांवर तोडगा निघत आहे, तेथील उमेदवार महायुतीकडून जाहीर केले जात आहेत. महायुतीच्या जागावाटपात तोडगा निघालेल्या दोन जागांसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने आतापर्यंत १४८ उमेदवार जाहीर करत ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यासह भाजप आतापर्यंत १५२ जागांवर पोहोचला आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्सही संपला असून येथे भाजपाचा उमेदवार राहील की शिंदेंच्या शिवसेनेचा असा प्रश्न गेले काही दिवसांपासून कायम होता. मात्र, आज भाजपाने उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी दिला आहे. त्यामुळे उमरेडमध्ये भाजपाचाच उमेदवार राहील हे स्पष्ट झाले आहे.
‘या’ चार जागा मित्रपक्षांना?
भाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना; मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.