मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती आखली जात असताना, पक्षाचे नेते अण्णामलाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, असे अण्णामलाई (BJP Annamalai On Mumbai) यांचे विधान समोर येताच विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.

मुंबईत मराठी मतदारांसह मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून विविध राज्यांतील नेत्यांना प्रचारासाठी मुंबईत बोलावण्यात येत आहे. अशाच प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना “बॉम्बे इज नॉट महाराष्ट्राज सिटी” असे विधान केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

नेमकं अण्णामलाई काय म्हणाले?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अण्णामलाई म्हणाले, “आम्हाला मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. देशात एकमेव मुंबई असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबईत भाजपचा महापौर असायला हवा. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईचे बजेट सुमारे 75 हजार कोटी रुपये आहे. तुलनेने चेन्नईचे बजेट 8 हजार कोटी तर बंगळुरूचे 19 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे या शहराच्या प्रशासनात सक्षम लोक असणे गरजेचे आहे.”

खासदार संजय राऊत यांची टीका
या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “हा 106 हुतात्म्यांचा अपमान आहे. अण्णामलाई यांना अटक करून मुंबईबाहेर जाऊ देऊ नये. देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर द्यायला हवे,” असे राऊत म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया…
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे. “हे अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार विधान आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.
अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीआधीच विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असून, हा वाद आगामी प्रचारावर किती परिणाम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







