मुंबई: विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. यानंतर विरोधकांकडून विनोद तावडे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. मतदानाच्या काही तास आधीच हा प्रकार झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या. दरम्यान विनोद तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले. त्यानंतर आता विनोद तावडे यांनी मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. स्वतः तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंबंधी माहिती दिली आहे.
काँग्रेस नेत्यांनी माझ्यासह पक्षाची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक अशी विधाने केल्याचे तावडे यांनी म्हटले आहे. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया यांनी विनोद तावडे हे ५ कोटी रुपये मतदारांना वाटताना रंगेहाथ सापडले, अशी विधाने केली. त्यांना विधानांनी माझ्यासह पक्षाला बदनाम करायचे होते. मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे, पण मी असे काम कधीच केले नाही. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांना माझी, भाजप आणि पक्षांच्या नेत्यांची बदनामी करायची होती, म्हणून ते जाणीवपूर्वक मिडिया, ट्वीटर आणि लोकांसमोर खोटे बोलले. त्यामुळेच मी काँग्रेस नेत्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे”, असं देखील विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.