पुणे : बदलापूर बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर ठाणे पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंब्रा बायपासवर अक्षयनेच पोलिसांसोबत झटापट केली, त्यानंतर पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवरच गोळ्या चालवल्या. त्यामुळे, स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी आरोपी अक्षयला ठार मारल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
परंतु, आरोपीला ठार मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, एन्काऊंटर म्हणजे जरब बसवण्याचा पोलिसांनी शोधलेला बहाणा असल्याची टीकाही काही जणांकडून होत आहे. तर, विरोधी पक्षातील नेत्यांनीही एन्काऊंटवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता, याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. तसेच, एन्काऊंटर हा सर्वोच्च न्यायालयाच्यामते खून असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. तसेच विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. व्यक्त केला आहे. तर, जे विरोधक आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत होते, ते विरोधक आता आरोपीची बाजू घेत असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, या घटनेवर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देताना, या घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, असे म्हटले आहे तसेच त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले असीम सरोदे…
अक्षय शिंदे मारला गेल्याचे वाईट वाटत नाही. मात्र, त्याला शिक्षा न्यायालयीन प्रक्रियेतून व्हायला हवी होती. ती झाली असती तर बदलापुरमधे जो प्रकार घडला तो इतर कुठे घडू नये यासाठी गाईड लाईन्स आणि नियम तयार करता आले असते. त्यामुळे अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायाधीशांच्या निगराणी खाली चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार करणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.
नातेवाईकांवर दबाव..
सर्वोच्च न्यायालयाच्या मते एन्काऊंटर हा खुन असतो, एन्काउंटरचे समर्थन करणारे लोकशाही व्यवस्थेत राहण्याच्या योग्यतेचे नाहीत. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करुन या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. शाळेच्या व्यवस्थापनातील लोक हे भाजप आणि आरएसएसच्या संबंधित आहेत. त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी हा एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोपही सरोदे यांनी यावेळी केला आहे. तसेच, एन्काऊंटर नंतर शाळेच्या व्यवस्थापनातील इतरांवर कारवाई करण्याची मागणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी सोडून द्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आम्ही इतर आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
बदलापूर आरोपीवरील गोळीबारप्रकरणी घटनेची न्यायालयीन चौकशी होईल, त्यासंदर्भात आज काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. याबाबत मला अधिकृत माहिती आज नाही, माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. तसेच, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.