मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुक ऐन तोंडावर आहे, या पार्श्वभूमीवर कुठल्याही क्षणाला केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊ शकतो. अशातच राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार असून महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने अधिकृत राजपत्र जारी केलं आहे.
‘या’ नेत्यांचा समावेश…
मंगळवारी शपथ घेणाऱ्या सात नावांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समावेश आहे. त्यांच्यासह विक्रांत पाटील, पंकज छगन भुजबळ, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, हेमंत पाटील, इद्रिस नाईकवाडी, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
ठाकरे गट न्यायालयात जाणार..
राज्यपाल नियुक्त आमदार निवडले तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत दिसत आहे. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
7 ऑक्टोबरला सदर याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे, परंतु, अजूनही निकाल बाकी आहे. या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे.