मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर शूटर शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम हा पुन्हा घटनास्थळी आला होता. यावेळी दोन पोलिसांनी त्यालाच शूटर्सना बघितले का? अशी विचारणा केली. यावर त्याने ‘नही देखा साहब’ असे उत्तर दिल्याचा दावा पोलीस चौकशीत केला आहे. तसेच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी लीलावती रुग्णालयाजवळ गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्याकडे
कसून चौकशी करत आहेत.
वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री तिघांनी गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. या हत्याकांडाचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखेने गोळीबारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तिघांसह एकूण २१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेने तब्बल एक महिना माग काढत उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाच्या (एसटीएफ) मदतीने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शूटर शिवाला १० नोव्हेंबरला उत्तर प्रदेशच्या बहराईचमधून बेड्या ठोकल्या आहेत.
शिवा हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे अधिकारी शिवाकडे कसून चौकशी करून गुन्ह्याचा तपास करत आहेत. याच दरम्यान, शिवाने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर अन्य दोन साथीदारांसह घटनास्थळावरून पळ काढला. काही अंतरावर जात शर्ट बदलून तो पुन्हा घटनास्थळी येऊन बघ्यांच्या गर्दीत उभा राहिला. येथे दोन पोलिसांनी आपल्याला शूटर्सना बघितले का? अशी चौकशी केली. तेव्हा नही देखा साहब असे सांगितल्याचा दावा त्याने केला आहे.
पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरुमेल सिंग या दोन्ही साथीदारांना पकडल्याचे त्याने बघितले. तरीही तो तेथेच गर्दीत थांबून सगळ्या घडामोडींचा आढावा घेत होता. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे की नाही? याची माहिती घेण्यासाठी लीलावती रुग्णालयाजवळ गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.