Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तहसीलदारांसह महसूल पथकावर हल्ला करण्यात आला आहे. गौण खनिजचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार महसूल पथकासह तेथे गेले होते. बुधवारी शहरातील देवळाई-कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी भागात ही घटना घडली आहे.
कचनेर रोडवरील सहस्त्रमुळी शिवारातून अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक केली जात होती. त्याबाबतची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांना मिळाली.त्यामुळे मुंडलोड यांनी या भागातील तलाठ्यांना कारवाईसाठी बोलावून घेतले. मुंडलोड स्वतः च्या खाजगी वाहनाने सकाळी पावणेदहाच्या सुमारास पथकासह सहस्त्रमुळी शिवारात दाखल झाले. या शिवारातून मुरूमाने भरलेला एक हायवा पकडण्यात पथकाला यश आले.
पकारवाईत अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरु असल्याचे समोर आले. पथकाने चालकाला हायवा तहसील कार्यालयाच्या दिशेने नेण्यास सांगितले. यावेळी पथकातील दोन तलाठी हायवामध्ये बसले होते. तहसीलदार मुंडलोड जेसीबीवर कारवाईसाठी पुढे गेले. मात्र, हायवा भिंदोन तांड्यापर्यंत आल्यानंतर चालकाने दोन्ही तलाठ्यांना धमकावत धक्काबुक्की सुरु केली. रस्त्यात हायवा थांबवून त्यात आणखी एक जण बसला आणि त्यांने देखील तलाठ्यांना मारहाण करून खाली ढकलून देण्याची धमकी दिली.