मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राज्याची राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा पक्ष असल्याचा दावा केला. (ajit pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याच्या विधानाला पुष्टी देण्यासाठी अजित पवार गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नोटिसीला उत्तर देताना अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा ठोकला होता. आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला होता. त्याला अजित पवार गटाने उत्तर दिले आहे.(sharad pawar)
पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर याबाबत म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार आणि अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली. अजित पवार गटाच्या वतीने विधिमंडळात २६० पानी सादर उत्तर करण्यात आले आहे. मूळ राष्ट्रवादी आमचीच आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील देखील आमच्यासोबत असल्यामुळे अध्यक्षांनी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडली आहे.
दरम्यान, आमदार अपात्रतेच्या प्रकरणी विधीमंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. शरद पवार गटाच्या आमदारांचे नोटीशीला १० पानी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (NCP Crisis)
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत दिली आहे. तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. आता कोणत्या गटाला दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी नेमकी कुणाची, हे आजमावणे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हाती आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rahul Narvekar)