मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठी निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यातील नेत्या अंजली दमानिया यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. दमानिया या मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र त्याआधीच अंजली दमानिया यांना रस्त्यातच पोलिसांनी रोखलं आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांना सांताक्रूज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना जुहू पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.(Anjali damania)
भुजबळांना फडणवीसांनी मराठा समाजाला विरोध करण्यासाठी उभं केलं आहे
जालन्यातील अंबडमध्ये काल ओबीसी एल्गार महासभा सभेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेवर अंजली दमानिया यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, कुठेतरी मला असं वाटतं आहे की, छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तावा तावाने भुजबळ कसे बोलतात पाह. जेलमधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचा. आता छातीत कळ नाही येत? असं अंजली दमानिया म्हणाल्या.(Chhagan Bhujbal )
छगन भुजबळ यांच्या निवास्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या घरी पोलिसांनी सुरक्षा आणि बंदोबस्त वाढवला असून ताफ्यातील पोलीस वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस खबरदारी घेत असून भुजबळांच्या घराबाहेर आणि परिसरात पोलीस गस्त घालत आहेत. (Mumbai Police News)