बेलापूर : बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) कोठडीतून दोन महिला आरोपींनी साडीचा दोरखंड बनवून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. कोठडीच्या दरवाजाला बाहेरून लावलेले कुलूप तोडून दोन्ही महिलांनी मागील बाजूच्या बाल्कनीतून जनरेटरला साड्या बांधल्या आणि त्याच्या मदतीने खाली उतरून पलायन केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे RPF कोठडीतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जुईनगर रेल्वे स्थानकातील रेल्वे गोदामातून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर चोरीला गेल्याप्रकरणी बेलापूर RPFने २६ सप्टेंबर रोजी रूपाली कैलास कुऱ्हाडे (रा. जालना) आणि शालीबाई अशोक पवार (रा. भिवंडी) यांना अटक केली होती. चौकशीनंतर दोघींना २७ सप्टेंबर रोजी सीएसएमटी येथील ३५व्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना बेलापूर RPF ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी महिला कर्मचाऱ्यांची गार्ड ड्युटीही लावण्यात आली होती.

मात्र, पहाटेच्या सुमारास दोन्ही महिलांनी कोठडीतून बाहेर पडण्याची संधी साधल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यांनी कोठडीच्या गजांमधून हात बाहेर काढून बाहेरून लावलेले कुलूप हिसकावून तोडले. त्यानंतर कडी उघडून त्या मागील दरवाजातून बाल्कनीत पोहोचल्या. अंगावरील साड्या काढून त्यांचा दोरखंड तयार केला आणि तो जनरेटरला बांधून दोघींनी खाली उतरून पलायन केले.

लॉकअप गार्ड म्हणून तैनात असलेली महिला हेड कॉन्स्टेबल बाथरूमला गेल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्याचे रात्रपाळीतील ठाणे अंमलदाराच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच RPFच्या पथकाने ठाणे परिसरासह आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेदरम्यान रूपाली कुऱ्हाडे ही सकाळी पावणेनऊच्या सुमारास नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात आढळून आली. तिला ताब्यात घेऊन बेलापूर RPF ठाण्यात आणण्यात आले आहे. मात्र, शालीबाई पवार अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.







