लोणी काळभोर, ता. 3 : पूर्व हवेलीत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या बेकरी, हॉटेल आणि खाद्य आस्थापनांच्या तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलसमोरील राजधानी बेकरीतून खरेदी केलेली तीन महिन्यांपूर्वीच मुदत संपलेली चॉकलेट एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित चॉकलेटची मुदत संपल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही तीच चॉकलेट पुन्हा विक्रीसाठी ठेवल्याचा दावा पालकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्याचा वाढदिवस असल्याने त्याच्या पालकांनी कदमवाकवस्ती येथील राजधानी बेकरीमधून चॉकलेट खरेदी केली होती. वर्गातील विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी ही चॉकलेट शाळेत नेण्यात आली. विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकांनाही चॉकलेट दिली. मात्र, वर्गशिक्षिकेने चॉकलेट खाल्ल्यानंतर तिच्या चवीबाबत संशय आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर चॉकलेटवरील पॅकिंग आणि मुदत तपासली असता, त्याची मुदत तब्बल तीन महिन्यांपूर्वीच संपल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच शिक्षकांनी संबंधित पालकांना माहिती दिली आणि उर्वरित चॉकलेटचे वाटप थांबविण्यास सांगितले.

चूक मान्य केली; पण चॉकलेट पुन्हा विक्रीसाठी?
पालकांनी तत्काळ राजधानी बेकरीमध्ये जाऊन चालकाकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी बेकरी चालकाने चूक झाल्याचे मान्य करून माफी मागितल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच मुदत संपलेली चॉकलेट ड्रॉवरमधून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आली असून ती फेकून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र, सुमारे तासाभरानंतर पालकांनी पुन्हा बेकरीमध्ये जाऊन पाहणी केली असता, तीच मुदत संपलेली चॉकलेट पुन्हा विक्रीसाठी ठेवलेली आढळल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित बेकरीच्या खाद्यपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुकाराम मुंडे साहेब, पूर्व हवेलीकडेही लक्ष द्या!
राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कारवाईचा मुद्दा चर्चेत असताना, पूर्व हवेलीतही अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून होत आहे. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर आणि परिसरातील बेकरी व हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
‘मुदत संपलेले खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले जात असतील, तर संबंधितांवर कारवाई होणार कधी?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासणी होते का आणि संबंधित बेकरीकडे मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांचा साठा आढळतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.






