नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत. अखेरीस आज (दि. ७) त्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी अमित शहा यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला फडणवीसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी नवी दिल्ली एनडीएमधील सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिते चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्तास देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे. तसेच फडणवीस यांना आपले काम सुरूच ठेवण्याचे निर्देश देखील शहांनी दिले आहेत.
तुमचे काम सुरु ठेवा, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ आणि चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही काम करत राहा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. गुरुवारी अपूर्ण चर्चा शुक्रवारी दुसर्या भेटीत पूर्ण झाली.
देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्र राज्यात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोपर्यंत तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक
दिल्लीमध्ये आज शुक्रवारी (दि. ७) भाजपप्रणित एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच घटकपक्षांनी नरेंद्र मोदींच्या नेतेपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे, नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठक झाल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत राज्यात झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने व पुढील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते.
प्रत्येक मतदारसंघात पोहोचण्याचा फडणवीस प्रयत्न करणार
पुढील चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करून ती बळकट करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आपल्याला राज्य सरकारमधून मोकळे करा, असा आग्रह फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केला आहे. परंतु, ही मागणी अमित शहांनी फेटाळली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जनादेश यात्रा काढण्याचा देवेंद्र फडणवीसांनी निश्चय केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.