मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी मोर्चा, साखळी उपोषण, सभा या मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आक्रोश केला. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी जोरदार मागणी आमदारांनी केली. दरम्यान, बुधवारी (ता. १) या मागणीसाठी मंत्रालयाला कुलूप लावण्यात आले होते. आज तिसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांनी आंदोलन केले. या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आक्रमक होऊन, त्यांनी मंत्रालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले. तसेच आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरक्षण मिळेपर्यंत आमचा पक्ष कोणताच नाही, अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा या वेळी आमदारांनी दिल्या. सरकार वेळकाढूपणा करत आहे, अधिवेशन का बोलावत नाही, असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मंत्रालयात आंदोलन करत असताना या आमदारांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना आझाद मैदानातील चौकीत आणण्यात आले आहे. मराठा आरक्षणासोबत मुस्लिम, धनगरांना आरक्षण हवे, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. जरांगे यांनी काल रात्रीपासून पाणी पिणे देखील बंद केले आहे. अशात आज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्ठमंडळ जाणार आहे. शिष्टमंडळाकडून जरांगे पाटील यांची समजूत काढून सरकारला थोडा वेळ देण्यात यावा यासाठी विनंती करून आंदोलन मागे घ्यावे अशीही विनंती केली जाणार आहे. आमदार बच्चू कडू उपोषणस्थळी तळ ठोकून बसणार आहेत. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामधील दुवा म्हणून कडू काम पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.