मुंबई : राजकारणात केल्या जाणाऱ्या घोषणा अनेकदा हवेतच विरतात, याचा प्रत्यय अनेकांना अनेकदा आला आहे. अशीच घोषणा एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंबाबत करण्यात आली होती. इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळवणाऱ्या अस्लम इनामदार व आकाश शिंदे या दोन्ही खेळाडूंना महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रत्येकी ७५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही फक्त घोषणाच ठरली असून, अजूनही त्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत आले आहे.
२०२३ मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाच्या वतीने हरयाणा, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील खेळाडू सहभागी झाले होते. भारताच्या या संघाने इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक झाले. विशेष म्हणजे इतर राज्यातील खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी रुपये रक्कम देण्यात आली. सोबतच क्लास वन पदाची नोकरी दिली गेली. याचवेळी अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील अस्लम इनामदार व आकाश शिंदे यांना प्रत्येकी ७५ लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. या खेळाडूंचे त्यावेळी मोठे कौतुक झाले. राजकीय पक्षातील नेत्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, इतर राज्यातील खेळाडूंचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले. पण, महाराष्ट्रातील खेळाडूंना अजूनही बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. याबद्दल क्रीडा क्षेत्रात तीव्र नाराजीचा सूर आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकांच्या तोंडावर बारामतीच्या जागेवरून विरोधकांकडून अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. युतीत सोबत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. यामुळे अजित पवार त्रस्त झालेले असतानाच, आता सुवर्णपदक मिळविलेल्या खेळाडूंना घोषणा करूनही बक्षिसाची रक्कम देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आल्याने अजित पवारांच्या टीकाकारांना आयतेच नवे कारण मिळाले आहे.