मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे डेंग्यूची लागण झाल्यामुळे यंदा बारामतीत होणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या दिवाळीत सहभागी होणार नाहीत. आजारपणामुळे आपल्यापासून दूर रहावं लागत आहे, डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे यावेळी आपल्याला भेटता येणार नाही असा संदेश बारामतीतील नागरिकांना पवारांनी दिला आहे.
महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह असताना सर्वाचं लक्ष लागलेले असते ते बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या दिवाळीकडे. दिवाळीच्या सणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतं आणि दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी मात्र, अजित पवार (Ajit Pawar) या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत.
दरवर्षी दिवाळीला आपणा सर्वांना भेटत असतो, दिवाळी पाडवाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सूचनेनुसार आपल्याला भेटता येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजारपणामुळे पुढील काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवारांचा संदेश
अजित पवारांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो”.
गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 8, 2023
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. डेंग्यूची लागण झाल्यामुळे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत असून डॉक्टरांच्या सल्यानुसार आणखी काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे.