मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मागील तीन चार दिवसांपासून माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला फार महत्त्व दिलं नाही. तसेच त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पुण्याचा पालकमंत्री होतो, असं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून येरवडा भागात परिसरातील जमिनीसंबंधित अजित पवारांवर आरोप केले होते. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
माझा स्वभाव जरी थोडा कडक असला, तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझ्याकडे आतापर्यंत अनेक विभागांचा कारभार होता, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांशी मी योग्य पद्धतीने वागलो, असं देखील अजित पवार म्हणाले. पुण्याच्या माजी आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात बरंच काही आहे, पण माझ्यावर फोकस का केला जातोय? असाही प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला.
दरम्यान, भिडे वाड्याबाबत महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 2015 आणि 2018 मध्ये राज्य सरकारने भूमिका मांडली. येथे राष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी सर्वाची इच्छा होती. मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन यामध्ये लक्ष घातलं. आता स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.