मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जांगासाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे. सर्वच पक्ष सावधान झाले आहेत. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 246 मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसतखेळत गप्पा बघायला मिळाल्या आहेत. विधानभवनात मतदानासाठी आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसत-खेळत गप्पा मारल्यानंतर या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी जयंत पाटलांशी हातात हात देऊन गप्पा मारल्या आहेत. तर, संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही केलं तेव्हा हे सार चित्र अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं.
सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडून सुद्धा नाव न घेता संजय राऊतांवर असाच निशाणा साधला जातो. मात्र, जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात, एकेमकांशी गप्पा मारत असतात, हे वास्तव लपून राहिलेलं नाही.
विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान
विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावेळी असे अनेक प्रसंग चित्र बघायला मिळाले आहेत. अजित पवार यांचा संजय राऊतांसमवेतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित दादांनी संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं बघायला मिळालं. तर, जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तगू केल्याचं दिसून आलं. विधानपरिषदेतील या दोन्ही भेटीवरुन राजकीय अर्थ लावले जात आहेत.
अरे व्वा..आपण परत एकत्र यायलाच पाहिजे..: संजय राऊत
संजय राऊत आणि चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो. तर, अरे व्वा..आपण परत एकत्र यायलाच पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे, संजय राऊतांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.