मुंबई : राज्यात सद्या जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा होऊ लागले आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेला विरोध करत आहेत. जनतेत चुकीची माहिती पसरवत आहे, मात्र विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला तरी आता विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यभर आज दहिहंडीचा आनंद आहे. जिथे दहीहंडीची सुरुवात झाली त्या टेंभी नाक्यावरच्या दहीहंडीचं आज शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी ते दहीहंडीसाठी जमलेल्या गोविंदांना संबोधित करत होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांकडून जोरदार तयारीला सुरवात झाली आहे. दरम्यान, महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बहिणी सुरक्षित नसतील तर योजना काय कामाची, अशी टीका होताना दिसत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी विरोधक कितीतीही आंकाडतांडव करू देत विधानसभेची दहीहंडी आपणच फोडणार असल्याचं विधान केलं आहे.
आता लाडक्या गोविंदांची काळजी..
लाडकी बहीण झाली नंतर लाडका भाऊ पण झाला. शेतकऱ्याचं वीजबील माफ केलं. लाडक्या भावांनाही स्टायफंड देण्यात येणार आहे. आता लाडक्या गोविंदांची काळजी घेतली आहे. दहीहंडीला विशेष क्रीडा प्रकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. गोविंदा पथकांमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदाचा इन्शूरन्स काढला जात आहे. आता गोविंदांसाठी सुट्टी सुद्धा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
तसंच टेंभी नाक्याच्या इथे सर्वात आधी आनंद दिघे यांनी दहीहंडीची सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली. त्यामुळे टेंभीनाक्याला गोविंदाची पंढरी म्हणून ओळखली जाते. मुंबईतील प्रत्येक गोविंदा पहिल्यांदा इथे माथा टेकतो आणि नंतर पुढे जातो. मात्र गोविंदांनी सुरक्षेची काळजी घ्यावी. हा साहसी खेळ आहे त्यामुळे कोणीही सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय दहीहंडी फोडण्यासाठी येऊ नये. असं आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी बॉलीवूड स्टार गोविंदा, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, आणि मराठी अभिनेता प्रसाद ओक यांच्यासह खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.