मुंबई : माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे आणखी दोन बडे नेते भाजप-सेनेच्या वाटेवर असल्याचे समजते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान आणि बसवराज पाटील हे कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी धनुष्यबाण हाती घेतला. देवरांपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान हेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
गेल्या विधानसभेला शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला होता. लांडे आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे नसीम खान यांना मतदारसंघ राहिला नाही. शिंदे गटात आल्यास विधान परिषदेवर संधी मिळेल. मंत्रिपदही मिळेल, असे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा नसीम खान यांच्याविषयी आहे. आपण मंत्री होणार असून शिवसेनेत जात आहोत, असे स्वतः नसीम खान सांगत असल्याची माहिती कॉंग्रेस नेत्याने दिली आहे.
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. पण आता बसवराज पाटील यांना उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढवायची आहे. लिंगायत समाजाच्या मतांच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो, असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याचे बोलले जात आहे.