मुंबई : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम 8 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा सुरु झालं नाही. यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन संभाजीराजे यांनी थेट मुंबई गाठली आहे. कार्यकर्त्यांसोबत ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी जाणार होते. मात्र गेट वे ऑफ इंडियाजावळ स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं.
अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं आहे. याची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती गेट वे ऑफ इंडिया परिसरात हुजर झाले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. समिती स्थापन होऊनही स्मारकाचं कामकाज का? झालं नाही असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा झाला मग शिवरायांचं स्मारक का रखडलं? असा प्रश्न देखील संभाजीराजेंनी विचारला आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपचं सरकार असताना स्मारकाचं काम का होत नाही? या स्मारकाबाबत जनतेला कळलं पाहिजे, आमचं कोणतंही आंदोलन नसल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, सरकारची दडपशाही सुरू आहे. आम्ही आंदोलन करायला आलेलो नाही. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. आम्ही ज्या मागण्यांसाठी आलो आहे त्या १३ कोटी जनतेच्या मागण्या आहेत. गडकोट, किल्ले आपलं जीवन स्मारक आहे असंही त्यांनी म्हटलं.
संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्य पक्षाची नुकतीच नोंदणी झाली आहे. प्रतिकात्मक आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. गडकोट संवर्धनासाठी मी १५ वर्षांपासून प्रयत्न करतोय. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन झालं तेव्हा मी तिथे हजर होतो. मोदींचं कौतुक केलं. वेळोवेळो मी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत विचारणा केली. त्यांचं एकच उत्तर आलं आणि ते म्हणजे प्रकरण कोर्टात अडकलं आहे.