Mumbai News : सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्ष पदावर होते, त्यांना हटवून आता शिंदे गटाच्या सरवणकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे .
नगरसेवक ते दोन टर्म आमदार
सदा सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांना तिकीट नाकारत पक्षाकडून बांदेकरांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी नाराज सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 ची निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. 2012 मध्ये सरवणकरांनी पुन्हा काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी सदा सरवणकरांवर विभागप्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले.