नवी मुंबई : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. नवी मुंबईतील परवडणाऱ्या घरांसाठी 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेत तब्बल 4,779 सदनिका उपलब्ध असून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेत खारघर, कळंबोली आणि तळोजा या भागांचा समावेश आहे. अर्जदारांना घरांची माहिती, किंमत, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया सिडकोच्या अधिकृत पोर्टलवर पाहता येणार आहे.

या योजनेतील सर्वाधिक घरे तळोजा सेक्टर 39 येथे उपलब्ध आहेत. येथे तब्बल 4,229 सदनिका असून त्यांची किंमत 23.50 लाख रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे तुलनेने परवडणाऱ्या दरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.

कळंबोली बस डेपो परिसरात 257 घरे उपलब्ध आहेत. या घरांची किंमत 37.70 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खारघर बस डेपो परिसरात 293 सदनिका उपलब्ध असून त्यांचे क्षेत्रफळ 322 चौरस फूट आहे. या घरांची किंमत 43.50 लाख रुपये आहे.
योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थींना त्यांच्या प्रवर्गानुसार या संधीचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेसाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत आहे आणि भारतात कुठेही त्यांच्या नावावर पक्के घर नाही, असे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
अर्ज करण्यापूर्वी नागरिकांनी सिडकोच्या https://www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर नियम काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. ऑनलाइन नोंदणी आणि योजनेशी संबंधित माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.







