पुणे : पुण्यातील एकबोटे कॉलनी परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून पुतण्याने आपल्या ६६ वर्षीय काकूवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. हल्ल्यानंतर त्याच्या साथीदाराने जखमी महिलेच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून घेतले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिनेश जुगराज सुराणा (वय ५८, रा. गंगाधाम) आणि त्याचा साथीदार फरमान मन्सूर पारकर (वय २८, रा. कोंढवा) हे दोघे ६६ वर्षीय महिलेच्या घरी गेले होते. दिनेश सुराणा याने व्यवसायासाठी काकूकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिला.

पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दिनेश सुराणा याने धारदार चाकू काढून महिलेच्या गळ्यावर आणि डाव्या मनगटावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

जखमी महिलेच्या कानातील सोन्याचे वेल हिसकावले
महिला जखमी झाल्यानंतरही आरोपींची दहशत थांबली नाही. दिनेशचा साथीदार फरमान पारकर याने महिलेच्या डाव्या कानातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे महिलेच्या कानालाही दुखापत झाली.
हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दिनेश सुराणा आणि फरमान पारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.







