मुंबई : मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत यांच्यापाठोपाठ आता ठाण्यातून शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण (सुलेखा शिवाजी सूर्यवंशी) यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

ठाणे महापालिकेच्या 5 (अ) या प्रभागातून सुलेखा चव्हाण जानेवारी 2026 मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुसूचित जमाती (ST) प्रमाणपत्राची वैधता तपासणी समितीसमोर प्रलंबित होती. धुळे येथील जात पडताळणी समितीने 16 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशात त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयाची दखल घेत ठाणे महापालिका प्रशासनाने बुधवारी त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली.

या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कायदेशीर माहिती दिली आहे. या पत्रामध्ये 16 जून 2026 पासूनच प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील नगरसेवक पद रिक्त मानण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील उबाठा गटाच्या नगरसेविकेनंतर आता ठाण्यातील सत्ताधारी शिंदे सेनेच्या नगरसेविकेलाही पद गमवावे लागल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सुलेखा चव्हाण बिनविरोध निवडून आल्यामुळे या प्रभागात आता नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. हे पद रिक्त घोषित झाल्यानंतर आता या प्रभागात पोटनिवडणूक होणार की प्रशासकीय स्तरावर इतर कोणती कारवाई केली जाणार, याकडे ठाणेकरांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे






