अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: स्वप्नांना वयाचे बंधन नसते हे दाखवून देणारा एक सुंदर प्रसंग शिरूर तालुक्यातील सातकरवाडी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त पाहायला मिळाला. जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या शौर्य रवींद्र टेमगिरे याने भविष्यात शिरूर तालुक्याचा आमदार होऊन आपल्या गावासाठी आणि संपूर्ण तालुक्यासाठी मोठे काम करण्याचा संकल्प केला.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शौर्यने आपल्या निरागस शब्दांत मोठे स्वप्न व्यक्त केले. मात्र, त्याच्या बालमनातील प्रामाणिकपणाही यावेळी दिसून आला. “मी अजून लहान आहे. मला स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजत नाही; पण मोठा झाल्यावर शिरूरचा आमदार होऊन गावासाठी आणि तालुक्यासाठी मोठे काम करणार,” असे त्याने सांगितले.

शौर्यच्या या निरागस संकल्पाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि त्याच्या आत्मविश्वासाचे सर्वांनी कौतुक केले. लहान वयातच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शौर्यच्या या स्वप्नाला उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शौर्यला मार्गदर्शक शिक्षक पोपट रासकर, मुख्याध्यापिका संगिता वाघ मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनय सातकर, शिवसेनेचे एकनिष्ठ ऋषिकेश टेमगिरे, विवेक सातकर, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे यांच्यासह उपस्थितांनी चिमुकल्या शौर्यच्या ध्येयाचे कौतुक केले.
आज स्वातंत्र्याचा अर्थ कदाचित शौर्यला पूर्णपणे समजत नसेल; पण उद्याच्या भारतासाठी काहीतरी करण्याचे त्याचे स्वप्न आणि मोठे होऊन समाजासाठी काम करण्याची जिद्द निश्चितच प्रेरणादायी आहे.







