पुणे : पुण्यात भररस्त्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच येरवडा परिसरातून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून एका तरुणावर धारदार शस्त्र आणि दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ या कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
येरवड्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौकात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीच्या प्रेमप्रकरणावरून हा वाद सुरू झाला. संशयिताने जुन्या प्रियकराचा पाठलाग करून त्याला रस्त्यात गाठले. त्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर धारदार शस्त्र आणि दांडक्यांनी हल्ला करण्यात आला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर संशयित तरुण घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हल्लेखोर अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.







