पनवेल: पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीत जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका महिलेने आपल्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी अंगणवाडीत जाण्यास तयार नसल्याने तिच्या आईने संतापाच्या भरात तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, बालिकेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. संबंधित महिलेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या व्हिडिओनंतर बालहक्क कार्यकर्त्यांनी घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित महिलेवर बाल न्याय (किशोर न्याय) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी समुपदेशन, संयम आणि प्रेमाची गरज असते. अशा प्रकारची मारहाण मुलांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.







