मुंबई : २०२३ वर्ष संपायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघी महानगरी मुंबई सज्ज झाली आहे. अनेकांनी यानिमित्ताने बाहेर फिरण्याचे प्लॅन देखील केले आहेत. तसेच गेटवे ऑफ इंडिया, चौपाट्या, विविध क्लब, महादुकाने, मैदाने अशा महत्वाच्या ठिकाणांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनीही कंबर कसली असून ३१ डिसेंबर रोजी शहरात सुमारे ११ हजार ५०० पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी शहरात २२ पोलीस उपायुक्त, ४५ पोलीस उपायुक्त, दोन हजार ५१ पोलीस निरीक्षक आणि ११ हजार ५०० पोलिसांची फौज रस्त्यावर उतरणार आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर तब्बल १३ हजार ५०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वाहतूक पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि शीघ्रकृती दलाचे जवान दिमतीला असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे.
केवळ पोलीसच नव्हे, तर शहरातील जल्लोषाला कोठेही गालबोट लागू नये याकरिता राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद दल (क्यूआरटी), तसेच पोलीस होमगार्ड यांच्या तुकड्याही जेथे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते अशा संवेदनशील स्थळी नेमण्यात येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, नेहमीप्रमाणे पोलीस गस्तही घातली जाणार आहे.
याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना, तसेच वाहतुकीचे नियम मोडणारे आणि बेदरकारपणे गाड्या पळवणाऱ्यांचे लगामही कसण्यात येणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी दंगाधोपा, राडेबाजी करणारे, स्त्रियांना त्रास देणारे अशा समाजकंटकांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धारही मुंबई पोलिसांनी केला आहे. सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून नव्या वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.