पुणे: श्रावण महिन्याचा शेवट आणि भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार असून पिठोरी अमावस्येचे खूप महत्व असते. यंदा 22 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या आहे. या दिवशी पितरांचे पूजन आणि तर्पण केले जाते, पण त्याचबरोबर हा दिवस मातृ सेवा करण्यासाठीही ओळखला जातो.
अमावस्येची वेळ आणि महत्त्व:
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्या तिथी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 11.57 वाजता सुरू झाली असून 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11.37 पर्यंत राहणार आहे. मात्र, मध्यान्हकाळी अमावस्या असल्याने 22 ऑगस्ट रोजीच पिठोरी अमावस्या साजरी केली जाणार आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून श्राद्ध आणि तर्पण करण्याची परंपरा आहे.
पिठोरी अमावस्येचे वैशिष्ट्य:
या दिवशी सुहासिनी महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या कल्याणासाठी उपवास करतात. तसेच, पिठाच्या मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे. दुर्गामाता आणि 64 योगिनींच्या मूर्ती पिठापासून तयार केल्या जातात. या दिवशी तयार केले जाणारे सर्व पदार्थ पिठाचे असल्याने याला ‘पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले आहे. अनेक घरांमध्ये भाताची खीर हा खास नैवेद्य तयार केला जातो.
मातृत्वाचा दिवस:
सामान्यतः अमावस्या अशुभ मानली जाते, परंतु पिठोरी अमावस्येचे व्रत अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते. मुलांच्या सुख-समृद्धीसाठी आईने केलेले हे व्रत असल्याने त्याला भारतीय संस्कृतीमध्ये एक विशेष स्थान आहे.







