पुणे प्राईम न्यूज डेस्क: दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली, कामाचा ताण आणि वेगळ्या सवयी यामुळे अनेक जोडप्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय. नात्यातील गोडवा राखण्यासाठी काही वेळा जोडप्यांना वेगळे झोपण्याचा निर्णय घ्यावा लागतो. यालाच ‘स्लीप डिव्होर्स’ असे म्हटले जाते. घटस्फोटाचा टोकाचा निर्णय न घेता काही कपल्स नातं टिकवण्यासाठी हा पर्याय स्वीकारत आहेत.

‘स्लीप डिव्होर्स’ म्हणजे नेमकं काय?
स्लीप डिव्होर्स म्हणजे विवाहबंधन कायम ठेवत, फक्त झोपण्यासाठी वेगळी व्यवस्था करणं. एकाच घरात राहत असतानाही पती-पत्नीने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या पलंगांवर झोपण्याचा निर्णय घेतला, तर त्याला ‘स्लीप डिव्होर्स’ असं म्हणतात. एकमेकांच्या झोपेतील अडथळा टाळणं हे यामागे कारण असतं .

वेगळं झोपण्याची गरज का भासते?
कधी एका पार्टनरला घोरण्याची सवय, तर कधी मोबाईलचा सततचा वापर, रात्रीची नाइट शिफ्ट, अचानक उठून फिरणे यामुळे दुसऱ्या पार्टनरची झोप खंडित होते. परिणामी चिडचिड, थकवा आणि वाद वाढू शकतात. या समस्या टाळण्यासाठी अनेक जोडपं ‘स्लीप डिव्होर्स’ स्वीकारत आहेत.

फायदे आणि तोटे
योग्य झोप मिळाल्यामुळे मानसिक शांतता आणि आरोग्य सुधारते. झोपेच्या त्रासामुळे उद्भवणारे वाद कमी होतात. एकमेकांना स्पेस मिळते, ज्यामुळे नात्यांतला दडपणाचा भाग कमी होतो. मात्र, याचे काही तोटेही आहेत. एकत्र न झोपल्याने जवळीक कमी होऊ शकते, संवाद कमी होतो आणि नात्यात तणाव वाढण्याचा धोका निर्माण होतो.
नातं टिकवायचं असेल तर…
स्लीप डिव्होर्स घेताना संवाद टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. केवळ झोपेसाठी वेगळं राहणं म्हणजे भावनिक दुरावा नव्हे. मात्र, त्याचे परिणाम जाणून योग्य तो समतोल राखणं आवश्यक आहे.
झोपेसारखा साधा विषयही नात्यांवर परिणाम करू शकतो, हे ‘स्लीप डिव्होर्स’च्या उदाहरणावरून स्पष्ट होतं. त्यामुळे नात्यात संवाद, समज आणि वेळ यांचं योग्य संतुलन राखणं गरजेचं आहे.







