सध्या थंडी अर्थात हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पाणी गरम वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यासाठी गिझर असो वा हिटरचा वापर केला जातो. पण, याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर धोकादायक ठरू शकतं. वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतं.
पाणी तापवण्यासाठी हिटर अर्थात इमर्शन रॉडचा वापर केला जातो. इमर्शन रॉड्स म्हणजेच पाणी तापविणाऱ्या रॉडचा वापर हिवाळ्यात वाढतो. गिझरच्या तुलनेत ते खूपच स्वस्त आहे. त्यामुळेच थंडीच्या दिवसात पाणी गरम करण्यासाठी अनेकजण त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. इमर्शन रॉड हे हीटिंग उपकरण आहे. याचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी केला जातो. इमर्शन रॉडमध्ये निक्रोम वायर असते. ही तार गुंडाळीसारखी वळलेली असते. त्याच्या वरच्या भागात प्लास्टिकचे इन्सुलेशन आहे. तर कॉइलची दोन्ही टोके तांब्याच्या नळीला जोडलेली असतात. हा भाग पाण्यात बुडवला जातो.
इमर्शन रॉड मॅन्युअल मोडमध्ये काम करते, त्यामुळे त्यात विद्युत शॉक लागण्याचा धोका जास्त असतो. जर वीज दीर्घकाळ पुरविली गेली तर ती जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो. याशिवाय विसर्जन रॉड चुकीच्या इलेक्ट्रिक स्विचमध्ये लावणेही धोकादायक आहे. यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.
तसेच इर्मशन रॉड खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांच्या इर्मशन रॉडच्या किंमतीची तुलना करा. त्याची किती महिन्यांची वॉरंटी किंवा हमी आहे हे नक्की पाहा. यामुळे कोणत्याही प्रकारचा दोष आढळल्यास तो सहजपणे बदलता येतो. इर्मशन रॉड खरेदी करताना किंमतीपेक्षा त्याच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या.