रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक सण, ज्यात भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या दिवशी, बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि समृद्धीची कामना करतात, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देत प्रेमाची भेटवस्तू अर्पण करतो.

ऐतिहासिक कथेमधून सणाचा उगम
रक्षाबंधन फक्त एक परंपरा नसून, त्यामागे ऐतिहासिक आणि पौराणिक कथा आहेत. त्यातील एक सर्वात प्रसिद्ध आणि मनोज्ञ कथा 16 व्या शतकातील आहे.

गुजरातचा सुलतान बहादूर शाह याने जेव्हा चित्तोडगढवर हल्ला केला, तेव्हा मेवाडच्या विधवा राणी कर्णावती हिला आपले राज्य वाचवणे कठीण झाले. अशा संकटाच्या वेळी, तिने मुघल सम्राट हुमायून याला राखी पाठवून त्याला आपला भाऊ मानले आणि मदतीची विनंती केली.

राणीच्या भावनिक सादेला प्रतिसाद देत हुमायूनने आपल्या सैन्यासह चित्तोडकडे प्रस्थान केले. दुर्दैवाने, त्याच्या मदतीच्या आधीच बहादूरशाहने किल्ला जिंकला आणि राणीने जौहर करून स्वतःचा आणि आपल्या सन्मानाचा त्याग केला. तरीही हुमायूनने चित्तोड पुन्हा जिंकून राणीच्या मुलांना सुरक्षितता आणि वारसाहक्क दिला. ही कथा आजही रक्षाबंधनाच्या मूळ संदेशाचे प्रतीक मानली जाते प्रेम, विश्वास आणि निःस्वार्थ रक्षण.
पौराणिक कथांमधील रक्षाबंधन
इतिहासाशिवाय रक्षाबंधनाशी पौराणिक कथा देखील जोडलेल्या आहेत:
भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची कथा प्रसिद्ध आहे. कृष्णाच्या हाताला जखम झाल्यावर द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून त्याला बांधले. त्या प्रेमाच्या नात्यातूनच कृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरणावेळी रक्षण केले, असे मानले जाते.
देवी लक्ष्मी आणि राजा बाली यांची कथा देखील रक्षाबंधनाशी संबंधित आहे. बालीने विष्णूंना द्वारपाल म्हणून ठेवले होते. विष्णूंना मुक्त करण्यासाठी लक्ष्मीने बालीला राखी बांधली आणि भाऊ मानून त्याच्याकडून वरदान मागून विष्णूंना मुक्त केले.
सणाचा संदेश
आजही रक्षाबंधन हा सण केवळ एक औपचारिक परंपरा न राहता, प्रेम, निष्ठा आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या नात्याला नवसंजीवनी देणारा हा सण, भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे एक अनमोल दागिने मानला जातो.
राखीच्या धाग्यात गुंफलेले हे नाते, काळाच्या ओघात अधिक दृढ होत गेले आहे आणि याच्या माध्यमातून परस्पर विश्वास, जबाबदारी आणि आत्मियता यांचा साज चढवला जातो.







