मुंबई : एका पती-पत्नीच्या जोडगोळीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पर्सनल असिस्टंट (पीए) असल्याचं भासवून 18 जणांना तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मूळचे पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (वय-49) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (वय-45, दोघे रा. नवी मुंबई) अशी आरोपींच नावे आहेत. त्यांनी स्वतःला एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे भासवून, बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि बनावट अपॉइंटमेंट लेटर दाखवून अनेकांची फसवणूक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याने स्वतःला एकनाथ शिंदे यांचा पीए असल्याचं सांगून अनेकांना नोकरी आणि इतर फायद्यांचं आमिष दाखवलं. या खोट्या ओळखीच्या आधारे त्यांनी 18 जणांकडून तब्बल 55 लाख रुपये उकळले. आरोपींनी सरकारी नोकरी मिळवून देण्याचं तसेच इतर मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देऊन ही रक्कम गोळा केली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी किंवा लाभ मिळाला नसल्याने, काही जणांनी पोलिसात याबाबत तक्रार केली.

या फसवणुकीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दाम्पत्याला ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आता या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? तसेच या दाम्पत्याने आणखी किती जणांना फसवलं आहे. याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना, अशा प्रकारच्या खोट्या ओळखींवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी संबंधित व्यक्तीची खात्री करावी. तसेच, अशा फसवणुकीच्या घटनांबाबत तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.







