मुंबई : फिटबिटने नवीन ‘फिटबिट चार्ज 6’ बँड लाँच केला आहे. यामध्ये 1.04 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने डिजाईन जास्त बदलली नाही. चार्ज 5 प्रमाणे दिसणाऱ्या नवीन चार्ज 6 बँडमध्ये नवीन हॅप्टिक बटण देण्यात आले आहे. चार्ज 6 मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स आहेत, ज्यात हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि टेम्परेचर सेन्सरचा समावेश आहे.
विशेष म्हणजे नवीन बँडमध्ये युट्यूब म्युझिक, गुगल मॅप्स आणि वॉलेटसारख्या सेवा वापरता येतात. हा ब्लॅक बँड विद ब्लॅक केस, रेड बँड विद गोल्ड केस आणि व्हाइट बँड विद सिल्व्हर केस कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये गुगल मॅप्सचा वापर करण्यासाठी जीपीएस आणि ग्लोनासचा सपोर्ट आणि गुगल वॉलेटसाठी एनएफसीचा सपोर्ट देखील आहे.
यामध्ये एक युट्यूब म्यूझिक अॅपदेखील मिळते. त्यामुळे मनगटावरूनच गाणी प्ले/स्टॉप आणि स्किप करू शकता. चार्ज 6 चा उपयोग करण्यासाठी युजर्सकडे एक गुगल अकाऊंट आणि एक फिटबिट अॅप असणे आवश्यक आहे. फिटनेस ट्रॅकर अँड्रॉइड 9.0 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या डिव्हायसेससह ios 15 आणि त्यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या iPhone सह चालू शकतो.