LifeStyle : पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, सन्मानाचे असते. त्यामुळे हे नाते जपण्यासाठी कधी पतीला तर कधी पत्नीला तडजोड करावी लागते. पण, अनेकदा महिलांनाच पतीच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. मात्र, अशा काही गोष्टी आहेत त्यांना वेळीच नकार दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे नात्यामध्ये दुरावाही येत नाही.
लग्नानंतर किंवा लग्नाच्या काही वर्षांनंतर पती जर पत्नीला तिची वैयक्तिक स्वप्ने, आकांक्षा किंवा करिअर सोडून देण्यास सांगत असेल तर ते योग्य नाही. पत्नीला तिची जीवनातील ध्येये आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि यासाठी तिचा आदर केला पाहिजे. त्यामुळे असे काही घडत असल्याचे आपली बाजू योग्य पद्धतीने समजावून सांगून परिस्थिती हाताळता येऊ शकते.
पतीने पत्नीचे वैयक्तिक स्वातंत्र्य जसे की नोकरी, शिक्षण, मैत्री किंवा वैयक्तिक आवडी-निवडी यावर बंधने आणली तर ते कदापिही सहन करू नका. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे स्वातंत्र्य आणि जीवनाचे निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यामुळे तुमच्याही बाबतीत हे घडत असेल तर योग्य भूमिका घेऊन सामंजस्य राखावे. अनेकवेळा पती पत्नीला आई-वडिलांच्या घरापासून किंवा मित्रांपासून दूर राहण्यास सांगतो.
कोणत्याही अनावश्यक दबावासाठी किंवा नियंत्रणासाठी हे होत असेल तर पत्नीने विरोध केला पाहिजे. प्रत्येकाला त्यांचे नातेसंबंध आणि सामाजिक संपर्क राखण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुटुंबियांकडे जाण्यापासून किंवा त्यांच्याशी बोलण्यापासून पती रोखत असेल तर यातून योग्य विचारविनिमय करून निर्णय घेणे गरजेचे आहे.