पुणे: अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima Pooja) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ दिवस मानला जातो. याच रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीवर वास करायला येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे या रात्री जागरण करून लक्ष्मीची, इंद्राची आणि चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागा आहे?’) असा प्रश्न देवी विचारते अशी मान्यता आहे, म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागिरी’ असेही म्हणतात.

कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, घरात सुख-समृद्धी आणणाऱ्या या पूजा विधीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या किरणांमधून अमृत वर्षाव होतो. या रात्री केलेली लक्ष्मीची पूजा घरात धन-धान्याची कमतरता भासू देत नाही, तर चंद्राच्या किरणांत ठेवलेले दूध (मसाला दूध किंवा खीर) खाल्ल्याने आरोग्य सुधारते, असा विश्वास आहे.
पूजा विधी (Pooja Vidhi)
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मुख्यत: देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, ऐरावतावर आरूढ असलेला इंद्र आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते.
1. तयारी:
- सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- घरातील मंदिर स्वच्छ करून, एका लाकडी पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवावे.
- त्यावर लक्ष्मी आणि विष्णूच्या मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी. अनेक ठिकाणी कुबेर आणि इंद्राची पूजा करण्याचीही प्रथा आहे.
2. पूजा आरंभ:
- देवासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि धूप-उदबत्ती लावावी.
- देवी-देवतांना गंगाजल अर्पण करावे.
- अक्षता (तांदूळ) आणि रोळी (कुंकू) यांचा टिळा लावावा.
- देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
3. नैवेद्य:
- गाईच्या दुधापासून तयार केलेली मसाला दूध किंवा खीर तयार करून देवासमोर ठेवावी.
- देवाला पांढरी मिठाई किंवा इतर फळे अर्पण करावी.
4. रात्र जागरण आणि चंद्र दर्शन:
- साधारणतः रात्री 11:30 ते 12:30 पुन्हा विशेष पूजा केली जाते.
- तयार केलेले मसाला दूध किंवा खीर एका चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात घेऊन रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवावी. चंद्राच्या किरणा दुधात पडावे आणि ते दुध पिल्यास आरोग्य चांगले होते.
- या रात्री जागरण करून भजन, कीर्तन किंवा लक्ष्मी-विष्णूच्या मंत्रांचा जप केल्यास विशेष लाभ होतो.
5. पारणे (समाप्ती):
- दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून, रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचा किंवा खिरीचा प्रसाद खावा.
- गरीब आणि गरजू लोकांना वस्त्र आणि अन्न दान करावे.
कोजागिरी पौर्णिमा ही केवळ पूजा आणि उपवास इतकीच मर्यादित नाही, तर आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा हा सण आहे. त्यामुळे चंद्रप्रकाशात एकत्रित येऊन मसाला दुधाचा आस्वाद घेत या मंगलमय रात्रीचा अनुभव नक्की घ्या.







