पटना : बिहारची राजधानी पटना येथील मसौढी ब्लॉक प्रशासनाची मोठी चूक समोर आली आहे. येथील आरटीपीएस काउंटरवर एका कुत्र्याच्या नावाने रहिवासी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात आवेदकाचे नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’ आणि आईचे नाव ‘कुटिया देवी’ असे नमूद आहे. विशेष म्हणजे, या प्रमाणपत्रावर कुत्र्याचा फोटोही चिकटवण्यात आला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

24 जुलै 2025 रोजी मसौढी अंचल कार्यालयातून हे रहिवासी प्रमाणपत्र (क्रमांक: BRCCO 2025/15933581) जारी करण्यात आले. यावर महसूल अधिकारी मुरारी चौहान यांची डिजिटल स्वाक्षरी देखील आहे. प्रमाणपत्रात पत्ता म्हणून कौलीचक, वॉर्ड क्रमांक 15, मसौढी, पटना असा उल्लेख आहे. हे प्रमाणपत्र व्हायरल झाल्यावर प्रशासनाने तातडीने रविवारी (27 जुलै) संध्याकाळी ते रद्द केले आणि महसूल अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी काढून टाकली आहे.

हे प्रमाणपत्र दिल्लीतील एका महिलेच्या कागदपत्रांशी छेडछाड करून बनवण्यात आले आहे. आरटीपीएस पोर्टलवर मोबाइल OTP, कागदपत्रे आणि फोटो अपलोड करणे आवश्यक असताना, असे फसवे प्रमाणपत्र कसे तयार झाले, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मसौढीचे मंडळ अधिकारी प्रभात रंजन यांनी प्रमाणपत्र रद्द केल्याची पुष्टी केली असून, याप्रकरणी सायबर फसवणूक आणि सरकारी कागदपत्रांशी छेडछाड केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पटना जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येणार असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही होणार आहे. याशिवाय, विभागीय आणि शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे.
बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरीक्षण अभियानादरम्यान (SIR) रहिवासी प्रमाणपत्रांसाठी अर्जांची संख्या प्रचंड वाढली होती. सीमांचलसारख्या संवेदनशील भागात विशेष तपासणीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, राजधानीतच अशा प्रकारची चूक घडल्याने डिजिटल पोर्टल्सवरील तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.







