अंडी (Eggs) हा ‘सुपरफूड’ मानला जात असला तरी, दररोज अंडी खाणाऱ्यांसाठी अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या ‘असोसिएशन ऑफ डाएटरी कोलेस्टेरॉल अँड एग कन्झम्शन विथ इन्सिडेंट कार्डिओव्हस्कुलर डिसीज अँड मॉर्टॅलिटी’ या महत्त्वपूर्ण अभ्यासात, अंड्यांच्या सेवनाचा थेट संबंध हृदयरोग आणि एकूण मृत्यूच्या वाढलेल्या धोक्याशी जोडला गेला आहे. यामुळे नियमित अंडी खाणाऱ्या अनेकांची चिंता वाढली आहे.

अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष काय?
शिकागोतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुमारे २९,६१५ लोकांवर १७.५ वर्षे निरीक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, अंड्यातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हे धोक्याचे मुख्य कारण आहे.

दररोज अर्धे अंडे खाल्ल्यास १७.५ वर्षांच्या कालावधीत हृदयरोगाचा धोका ६ टक्क्यांनी वाढतो.तसेच, मृत्यूचा धोका ८ टक्क्यांनी वाढू शकतो.अभ्यासात असेही आढळून आले की, आहारात दररोज ३०० मिलिग्रॅम (mg) कोलेस्ट्रॉलचे सेवन केल्यास हृदयरोग होण्याचा धोका १७ टक्क्यांनी, तर मृत्यूचा धोका १८ टक्क्यांनी वाढतो.

एका अंड्यात किती कोलेस्ट्रॉल?
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या अंड्यामध्ये साधारणपणे १८६ मिलिग्रॅम (mg) कोलेस्ट्रॉल असते. हेच कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक असून त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
तुम्ही काय काळजी घ्याल?
अंडी जरी ऊर्जेचा आणि पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असली तरी, या नवीन अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर दररोज अंडी खाण्याचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, केवळ अंड्यावरच नाही, तर तुम्ही घेत असलेला एकूण आहार आणि तुमचे व्यायाम करण्याचे प्रमाण या इतर गोष्टींवरही लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणताही मोठा आहार बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.







