LifeStyle : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे काही जणांचा फिरायला जाण्याचा प्लॅन ठरलेला असतो. मात्र, कसं जावं अन् कुठं जावं हा प्रश्न हमखास पडतो. त्यातील बहुतांश जण दुचाकी अर्थात बाईकने जाण्याला पसंती देतात. तुम्ही देखील बाईकने पावसाळ्यात रायडिंग करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. त्याने तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
पावसाळ्यात बाईक रायडिंगची एक वेगळीच मजा असते. एकीकडे हिरवीगार झाडे, थंड वारा आणि पावसाची रिमझिम या वातावरणात बाईकवर फिरायला जाण्याचा आनंद अनेकजण घेत असतात. पण देशातील रस्त्यांची स्थिती पाहता कधी कधी पावसाळ्यात बाईक रायडिंग घातकही ठरू शकते. त्यामुळे बाईक रायडिंगला जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
बाईकवरून तुम्ही जर लाँग राईडला जाणार असाल तर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुमच्या बाईकच्या टायर्सची स्थिती चेक करा. याची काळजी घ्या की, टायरची ग्रीप व्यवस्थित असावी. याने रस्त्यावर स्लीप होण्याचा धोका राहणार नाही. तसेच तुम्ही योग्यप्रकारे तुमचा वेग कायम ठेवू शकाल आणि बिनधास्त होऊन रायडिंगचा आनंद घेऊ शकाल. टायरमध्ये हवेची स्थिती देखील चेक करा. त्याने पुढील धोका टाळता येऊ शकतो.
पावसाळ्यात बाईकने फिरायला जाणार असाल तर महत्त्वाच्या कामांमध्ये वॉटरप्रूफ रायडिंग गिअरचाही समावेश करा. हाय-व्हिजिबिलीटी रेनकोट घ्या, जो तुम्ही कपड्यांवर किंवा रायडिंग जॅकेटसोबत घालू शकाल. याने तुम्ही पावसात भिजणार नाही आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही. पावसाळ्यात तुम्ही जर लाँग ड्राईव्हला जात असाल तर हेल्मेटमध्ये अँटी-फॉग कोटिंग करा. जेणेकरून पावसात हेल्मेटच्या काचेवर जमा होणाऱ्या दवांमुळे बाईक चालण्यात अडचण येऊ नये.