हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा अर्थ कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील गावकऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. गावकऱ्यांनी इनामदार वस्ती येथील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला अन् जिद्दीने तो प्रत्यक्षात उतरवला देखील आहे. आजतागायत इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला ५० लाख रुपये खर्च लोकसहभागातून करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचे मंदिर’ उभारले जात आहे. अर्थात यात कोरेगाव मूळचे स्थानिक नर्सरी व्यावसायिक उद्योजक सोपान शितोळे हे धावून येत त्यांनी स्वमालकीची पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगची तब्बल ६० ते ६५ लाख रुपये किमतीची जागा शाळेला दिली. तसेच स्वखर्चातून ही जागा बक्षीस पत्राने ग्रामपंचायतीला दिल्याने या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून १९ लाख रुपये वर्गखोल्यांसाठी निधी मंजूर आला आहे. यामुळे पंचक्रोशीतील गोरगरीब नागरिकांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे.
कोरेगाव मूळ हे गाव पुणे – सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला विस्तारले असून इनामदारवस्ती येथे मोठ्या प्रमाणावर नर्सरी व्यावसायिक असल्याने या ठिकाणी वस्त्यांची संख्या मोठी आहे. या भागात सोलापूर, लातूर, बीड, नांदेड आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामाच्या निमित्ताने आले आहेत.
त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय व त्यांची मुले असल्याने या परिसरात एकच इयत्ता चौथीपर्यत जिल्हा परिषद शाळा होती. पत्र्याच्या वर्गखोल्या असल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना उन्हाळा, पावसाळा या ऋतूत समस्यांना तोंड द्यावे लागत होते. पावसाळ्यात छताची गळती तर उन्हाळ्यात पत्रे तापल्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता.
मागील दोन ते तीन वर्ष जागेअभावी इनामदारवस्ती येथील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विद्यार्थ्यांची शिक्षणाची अवस्था पाहता शिक्षणासाठी जागेअभावी बेघर झालेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शितोळे यांनी दान स्वरूपात ६०ते ६५ लाख रुपयांची जागा दिली आहे. या शाळेला तीन खोल्यांची मंजुरी मिळाली असून या कामासाठी १९ लाख ५१ हजार रुपयांचा फंड मिळाला आहे. तर लोकवर्गणीतून आजतागायत तसेच कोणाच्या स्वइच्छेने शाळेचे काम सुरु असून आतापर्यंत ५० लाख रुपये इतका खर्च आला आहे.
अशी असेल नवीन इमारत..
मागील वर्षी दोन मजली नवीन इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. एकूण ४ वर्गखोल्या असलेल्या या प्रशस्त इमारतीमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, संगणक खोली, प्रयोगशाळा, शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली बांधण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व..
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था…विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ…शासनाचे दुर्लक्ष…अशा आशयाच्या बातम्या विविध व्रुतपत्राद्वारे छापण्यात आल्या होत्या. एवढेच काय, तर शाळेला इमारत नाही म्हणूनहि बातम्या देण्यात आल्या होत्या. मात्र हे सर्व करून प्रश्न सुटला नाही. मात्र लोकसहभागातून प्रत्यक्ष कृती केली, प्रश्न सोडविण्यात सहभाग घेतला तर इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेसारखे सुखद चित्र पहायला मिळाले व कोरेगाव मूळ येथील गावकऱ्यांनी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
परिसरातील नागरिकांनी केली मदत..
कोरेगाव मूळ, इनामदारवस्ती येथील उद्योजक नागरिकांनी आजतागायत ५० लाख रुपये व त्यापेक्षा जास्त किमतीचे साहित्य हे शाळेला दान स्वरुपात दिले आहे. यामध्ये शाळेसाठी वापरण्यात येणारे मार्बल, फरशी, सिमेंट, किचनशेडचे बांधकाम, लाईट फिटिंग, रोख रक्कम, आदी स्वरुपात साहित्य देण्यात येत आहे.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे व धनंजय शितोळे म्हणाले, “आजच्या इंग्लिश मिडीयमच्या युगात जिल्हा परिषद शाळा या हरवत चालल्या आहेत. या शाळा जपण्याचे काम आता नाही केले तर या शाळा भविष्यात बंद पडतील. त्यामुळे धनदांडगे व श्रीमंत लोकांचीच मुले शिक्षण घेऊ शकतील. तेच आर्थिक फायदा कमविणार व गोरगरिबांची मुले घडविण्याचे काम हि सामाजिक कार्यातून उभारलेली शाळा करणार आहे. त्यामुळे हि जपण्याचे कार्य आम्ही सुरु केले आहे. तसेच या ठिकाणी सेमी इंग्लिश शाळेची मागणी करणार आहोत.
या नागरिकांचा मोलाचा वाटा…
- सोपान शितोळे, – ६० लाख रुपयांची जागा,
- संतोष शितोळे – १० लाख रुपये
- स्वप्नील सावंत – इनामदार – ४ लाख रुपये,
- अशोक बापू इनामदार – १ लाख रुपये,
- दिलीप शितोळे – ४ लाख रुपये
- महेंद्र शितोळे – ५१ हजार,
- कृपा नर्सरी – १ लाख रुपये, वीट
- भाऊसाहेब चौधरी – १०० गोणी सिमेंट,
- पुण्यातील क्रस्तल डाय कंपनी – ५१ हजार,
- राहुल जगताप, अनिल बदर, यांनी आर्थिक मदत केली आहे