पुणे : पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागातून एका तरुण उद्योजकाचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे . बाभळेश्वर विभागाच्या महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर तब्बल 3 किलोमीटर थरारक पाठलाग करत एका तरुणीसह 6 जणांच्या मुसक्या आवळल्या. या यशस्वी कारवाईमुळे अपहृत तरुणाची सुरक्षित सुटका झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चिखली येथून आरशद सिद्दीकी (वय 24) या तरुणाचे अर्टिगा कारमधून अपहरण करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला.आरोपी अर्टिगा गाडीने समृद्धी महामार्गावरून उत्तर प्रदेशकडे जात असल्याची टीप मिळताच बाभळेश्वर महामार्ग पोलिसांनी कडक नाकाबंदी लागू केली. चॅनल क्रमांक 523 जवळ संशयित कार भरधाव वेगाने जाताना दिसताच पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला.

सुमारे 3 किलोमीटर चाललेल्या थरारानंतर पोलिसांच्या पथकाने चॅनल क्रमांक 520 जवळ आरोपींच्या गाडीला चहूबाजूंनी अडवले आणि कार ताब्यात घेतली.गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये पीडित तरुण आरशद सिद्दीकी सुखरूप आढळून आला. पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या मूळ रहिवासी असलेल्या 6 आरोपींना (ज्यात एका महिला आरोपीचा समावेश आहे) घटनास्थळावरूनच बेड्या ठोकल्या.

पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सर्व आरोपी, सुटका झालेला तरुण आणि गुन्ह्यात वापरलेली कार कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. अत्यंत तत्परतेने आणि धैर्याने केलेल्या या कामगिरीबद्दल महामार्ग पोलिसांचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.







