पुणे: रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सूरज शर्मा याच्याविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल असूनही त्याला अद्याप अटक का झाली नाही, या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आज बावधन परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शर्मा विरोधात घोषणाबाजी करत त्याच्या त्वरित अटकेची जोरदार मागणी केली.

संबंधित प्रकरणात रामचंद्र इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेला सूरज शर्माने वारंवार टोमणे मारत त्रास दिला होता. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शर्मा याने तिला “तू खूप छान दिसतेस” असे म्हणत तिचा हात पकडून ओढले आणि छेडछाड केली. या प्रकारामुळे पीडित महिलेने थेट बावधन पोलीस ठाणे गाठले आणि सूरज शर्मा विरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात छेडछाडीचा गुन्हा दाखल झाला असला तरी, पोलिसांकडून अद्याप शर्माला अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मनसे विद्यार्थी सेनेने संतप्त प्रतिक्रिया देत आज बावधन येथील संस्थेसमोर आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलकांनी “मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय सूरज शर्माला तात्काळ अटक झालीच पाहिजे” असा नारा दिला.

मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतरही जर आरोपीला मोकळे सोडले जात असेल, तर पोलिस यंत्रणांवर जनतेचा विश्वास उरणार नाही. महिला सुरक्षेसाठी मनसे नेहमीच आवाज उठवत आलेली आहे, आणि भविष्यातही जर अशा प्रकारचे अन्याय घडले, तर मनसे तितक्याच तीव्रतेने आंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. दरम्यान, बावधन पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत.







