खेड: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न जुळवण्याच्या आमिषाने एका शेतकऱ्याची तब्बल १ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी चार महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात आनंदा सयाजी जैद (वय ६०, रा. जैदवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ज्योती संतोष तांबोळी (वय ४०, रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर) या महिलेने आपल्या ओळखीतील सुवर्णा उत्तम गव्हाणे (वय २८, रा. उमरगा, जि. धाराशिव) हिच्याशी फिर्यादींच्या मुलगा स्वप्नील आनंदा जैद (वय २८) याचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले.
या लग्नासाठी सुवर्णा गव्हाणे, तिची मामी अनुसया राजेंद्र मोरे (वय ५०, रा. उमरगा, जि. धाराशिव) व मावशी मनीषा बाळू कदम (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, निलंगा, जि. लातूर) यांनी संगनमत करून मिळून फिर्यादीकडून एकूण १ लाख ६० हजार रुपये घेतले.

त्यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता ते २५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत जैदवाडी येथे अत्यंत घाईघाईत लग्न लावण्यात आले. परंतु, लग्नानंतर काही तासातच वधू सुवर्णा गव्हाणे पळून गेली. त्यामुळे जैद कुटुंबीयांना लग्नाच्या कार्यक्रमात अनाठायी खर्च करावा लागला. वरपक्षाला यामुळे मोठा मानसिक व आर्थिक धक्का बसला.
या घटनेनंतर संबंधित महिलांकडे संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी न घेतलेले पैसे परत केले, ना कोणते स्पष्टीकरण दिले. त्यामुळे ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित फसवणूक असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
खेड पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे ज्योती तांबोळी, सुवर्णा गव्हाणे, अनुसया मोरे आणि मनीषा कदम या चार महिलांविरोधात फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे दाखल केले आहेत. सध्या पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.







