पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान अत्यंत गंभीर स्वरूपात झाले. या वादाचा राग मनात धरून दोन तरुण रिक्षाचालकांनी दुसऱ्या रिक्षाचालकावर हत्याराने सपासप वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

ही घटना ११ जून रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास धानोरी येथील साईधाम सोसायटी परिसरात घडली. नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०, रा. विश्रांतवाडी) हे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून, त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून परशुराम राजू मानिके (वय २१) आणि नागेश मानिके (वय १९, दोघे रा. भिमनगर, विश्रांतवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अन्य एका साथीदारावरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ जून रोजी सायंकाळी तिडंगे आणि आरोपी यांच्यात रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. त्या वेळी दोघांत शाब्दिक चकमक झाली आणि काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली होती. वादानंतर तिडंगे यांनी आपली रिक्षा घेऊन एका प्रवाशाला सोडण्यासाठी धानोरीतील साईधाम सोसायटीत गेले. प्रवाशाला सोडल्यानंतर ते पुन्हा परत येत असताना तिघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले.

रागाच्या भरात आरोपींनी हातात हत्यार घेऊन तिडंगे यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या हातावर, पायावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. आरोपींनी अत्यंत क्रूरतेने हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिडंगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले या प्रकरणाचा तपास करत असून, अटक करण्यात आलेल्या दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिसरा आरोपी फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रिक्षाचालकांमधील स्पर्धा आणि वादांचे वाढते प्रमाण ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. पोलीस प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







