लोणी काळभोर: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची आणि आध्यात्मिक परंपरेची अमूल्य ठेव आहे. लाखो वारकऱ्यांच्या भावनांशी जोडलेल्या या वारीच्या दरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे . असे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी केले आहे.

शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी स्वतः पुढाकार घेत, पालखी तळ व मार्गाची आज शुक्रवारी पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर लोणी काळभोर येथील हॉटेल S4G येथे आढावा बैठक येथे पार पडली. त्यावेळी बोलताना वरील प्रतिपादन आमदार कटके यांनी केले आहे. यावेळी पालखी मार्गावरील वाहतूक, सुरक्षितता, मुक्काम स्थळांची तयारी, आरोग्य सुविधा, गर्दी नियंत्रण यांसह विविध मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली. प्रशासन, पोलीस, PMRDA, MSRDC, बांधकाम विभाग व इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीपूर्वी आमदार कटके यांनी स्वतः पालखी मुक्काम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. येथे तब्बल १६ एकर जागा निवडण्यात आली असून, वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरती निवास व्यवस्था उभारण्यात येणार आहे. ४०० टॉयलेट्स, स्वच्छता केंद्रे,हिरकणी कक्ष,आरोग्य तपासणी केंद्र यांचीही योजना आखण्यात आली आहे. पालखी मार्गावर उतार-चढाव असलेल्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून PMRDA अधिकाऱ्यांना त्वरित मुरूम टाकून ते सपाट करण्याचे आदेश देण्यात आले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी निवारा, वैद्यकीय मदत आणि अन्न पुरवठा या बाबींमध्ये कुठलाही त्रुटी राहू नये, यासाठी आरोग्य विभाग सज्ज ठेवण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून १००० बॅरिगेट्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बाय टॉवर्स, आणि ॲम्बुलन्स यांचीही तजवीज केली जाईल. चोरी किंवा अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सोहळ्याच्या दोन दिवस आधीच ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
प्रत्येक वर्षी लोणी काळभोर रेल्वे क्रॉसिंगजवळ होणाऱ्या अपघातांचा अनुभव पाहता, या ठिकाणी यावर्षी विशेष बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पालखी मार्गावर येणाऱ्या टोलनाके ते स्थानिक थांबे यामध्ये वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठीही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.
सोलापूर हायवेच्या बाजूच्या सर्व्हिस रोडखाली असलेल्या ड्रेनेज लाईनमधील अनेक झाकणे खराब झाली असून, पाणी साचून अपघाताची शक्यता आहे. ही समस्या लक्षात घेता PMRDA ला तातडीने दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक, सूचना फलक लावण्याचाही आदेश यावेळी देण्यात आले. पालखीमुळे काही रस्ते बंद ठेवावे लागतात. यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून अशा नागरिकांना पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य करावे, अशी भावनिक पण कणखर सूचना आमदार कटके यांनी केली.
यावेळी पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे, लोणी काळभोर चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे उरुळी कांचन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, प्रशांत काळभोर, चित्तरंजन गायकवाड, संतोष आबासाहेब कांचन, संतोष उर्फ पप्पू कांचन, अमित बाबा कांचन, आबासाहेब काळे, दिलीप वाल्हेकर, नासिर पठाण, युवराज काकडे व विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार कटके यांनी बोलताना सोलापूर रोड वरील उड्डाणपूल मंजूर असल्याचे सांगितले, पण काम सुरू होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले
या दौऱ्यात आमदार कटके यांनी स्पष्ट केले की, सोलापूर रोडवरील वाहतूक कोंडीसाठी शासनाकडून एक भव्य उड्डाणपूल मंजूर करून घेण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईपर्यंत नागरिकांना अजून त्रास होऊ नये म्हणून काही तात्पुरत्या उपाययोजना तत्काळ राबविणे गरजेचे आहे.सोलापूर रोडवरील प्रमुख जंक्शन, चढ-उताराचे ठिकाणे, सिग्नल यंत्रणा, सर्व्हिस रोड, बस थांबे, आणि दुर्घटनाग्रस्त भागांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्या अनुषंगाने त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.या संपूर्ण दौऱ्यामुळे सोलापूर रोडवरील वाहतूक सुसाट होण्याची अपेक्षा असून, येत्या काळात नागरिकांना स्वच्छ, सुगम आणि अडथळारहित प्रवास अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आ. माऊली कटके यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या विधानातून स्पष्ट होते –
“वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. माझ्यासाठी हा सोहळा फक्त अध्यात्मिक नाही, तर वारकऱ्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारीही आहे. त्यांच्या सेवेसाठी मी आणि माझी संपूर्ण यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत राहणार आहे.”
ही बैठक फक्त प्रशासनिक नव्हे, तर एका श्रद्धेच्या पर्वासाठी सुसज्जतेचा आणि समर्पणाचा एक जिवंत दस्तऐवज ठरली







