पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे शुक्रवार, १४ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी १७ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हे संकेतस्थळ पूर्णतः बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना कोणतीही ऑनलाइन सेवा मिळणार नाही, अशी माहिती महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना अधिक पारदर्शक, गतिमान आणि डिजिटल सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संकेतस्थळ विकसित केले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरणे, जन्म-मृत्यू नोंदणी, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज, सार्वजनिक सुविधांची माहिती, शहर विकास आराखडे, धोरणे व तक्रारी दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावरून नागरिकांना अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन स्वरूपात सहज उपलब्ध होतात. यात मालमत्ता कर भरण्याची सोय, तसेच जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिक आपल्या तक्रारी देखील संकेतस्थळावर नोंदवू शकतात आणि त्यांचे ट्रॅकिंगही करू शकतात. याशिवाय, महापालिकेच्या विविध योजना, उपक्रम व शहरी विकासाशी संबंधित दस्तऐवज, अपडेट्स आणि महत्वाची माहिती देखील या संकेतस्थळावर सहजपणे पाहता येते.

सध्या या संकेतस्थळावर नागरिकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु या डिजिटल सुविधांना अधिक सशक्त व सुरक्षित बनवण्यासाठी देखभाल व सुधारणा आवश्यक असल्यानेच हे तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. हे देखभाल काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी ६ नंतर संकेतस्थळ पूर्ववत सुरू होईल, असेही पोमण यांनी स्पष्ट केले.
या कालावधीत नागरिकांनी आवश्यक असलेल्या ऑनलाइन सेवा योजून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, दोन दिवस संकेतस्थळ बंद राहणार असल्यामुळे मालमत्ता कर भरणे, जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया, तसेच अन्य ऑनलाइन कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.







