पुणे: खेड तालुक्यातील बहुळ (ता. खेड) येथील पानसरेवस्तीमध्ये शुक्रवारी (दि. ६ जून) सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती वादातून पुतण्याने चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत भोसकून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात मृत व्यक्तीचे नाव दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा. पानसरेवस्ती, बहुळ) असे आहे. तर, आरोपीचे नाव दशरथ गुलाब पानसरे (रा. बहुळ, ता. खेड) असे असून त्याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तुकाराम दत्तात्रय पानसरे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी घरगुती वादातून दशरथ याने त्याचा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यास लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तुकाराम यांनी तो हल्ला थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला असता त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी वडील दत्तात्रय पानसरे हे हस्तक्षेप करत, “तुकारामला का मारतोस?” असे विचारण्यासाठी पुढे आले. तेव्हा, दशरथ याने संतापाच्या भरात लोखंडी रॉड थेट त्यांच्या छातीत भोसकला. गंभीर जखमी अवस्थेत दत्तात्रय पानसरे यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दशरथ याला अटक केली. पोलिसांनी गुन्ह्याचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथक अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने पानसरेवस्ती परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं असून, कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.







