अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती: पारोडी गावातील किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्याच्या टोपीवर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाल्याची भयंकर घटना १२ जून रोजी रात्री घडली. रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत टोपीचा काही भाग कोसळला असून, घरातील सर्व इलेक्ट्रिक उपकरणे, लाईट फिटिंग, वीज मीटर जळून खाक झाले आहेत. या घटनेमुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे अचानकपणे वीज कोसळली. घराच्या टोपीवर वीज पडताच “बॉम्ब फुटावा” असा प्रचंड आवाज झाला आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आवाजाने संपूर्ण शेजारील परिसर हादरला. वीज कोसळल्यानंतर टीव्ही, फ्रीज, पंखे, लाईट फिटिंग्स तसेच वीज मीटर पूर्णपणे जळून गेले. सर्व इलेक्ट्रिक साहित्य निकामी झाले आहे. घराच्या टोपीचा काही भाग तुटून खाली कोसळला, त्यामुळे बांधकामाचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पारोडी गावाचे पोलीस पाटील कुंडलिक येळे व तलाठी कोमल माने यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. नुकसान भरपाईसाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तलाठी कोमल माने यांनी सांगितले.







