शिरूर: न्हावरे फाटा (ता.शिरूर) येथे अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. शिरूर शहरासह तालुक्यात अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात शिरूर पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गुटखा माफियांच्या हालचालींना काही प्रमाणात चाप बसला असून, त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.१२) पोलीस हवालदार राहुल भवर यांना गुटखा वाहतुकीसंदर्भात गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे शिरूर-पुणे रस्त्यावर न्हावरा फाटा येथील कानिफनाथ मंदिराजवळ पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी संशयास्पद एम.एच-१२,आर.पी- २६७२ क्रमांकाच्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षाची तपासणी केली असता, त्यामध्ये हिरा पानमसाला व रॉयल ७१७ कंपनीचे सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ सापडले.
या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे ४४ हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य माल तसेच १ लाख रुपयांची रिक्षा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात संगमनाथ नागनाथ कनजे (रा.शिक्षक कॉलनी,रामलिंग रोड,शिरूर,जि.पुणे) यास अटक करण्यात आली असून, त्याचा दुसरा साथीदार व आरोपी दिपक गुगळे (रा. वनविभाग कार्यालय शेजारी,शिरूर, जि.पुणे) हा फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, प्रविण सांगळे आणि राहुल भवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच दुसऱ्या फरार आरोपीचा शोध शिरूर पोलीस घेत आहेत. “प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल” असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे. तसेच “या संदर्भात माहिती देणाऱ्यांचे नावही गोपनीय ठेवले जाईल” असे पोलिसांनी सांगितले आहे.







