Yavat News: पुणे : यवत (Yavat News) पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या आत्महत्येच्या पोस्टमुळे चर्चेत आले होते. गेल्या 5 दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर ते सुरक्षित घरी परतले आहेत. याबाबतची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी माध्यमांना दिली. (Nikhil Randive)

हेही वाचा- भोसरीच्या ‘त्या’ जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना विशेष न्यायालयाचा दणका; प्रकरण काय?
सुमारे 5 दिवसांपूर्वी रणदिवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे नाव नमूद केले त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. पोस्ट टाकल्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटसही पोस्ट केले आणि त्यानंतर ते घरातून अचानक बेपत्ता झाले. या घटनेमुळे कुटुंबीय, सहकारी आणि पोलीस प्रशासन सर्वच चिंतेत होते.

रणदिवे यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर यवत पोलीस ठाणे, शिक्रापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त टीम रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी काम करत होती.

काल मध्यरात्री निखिल रणदिवे सुरक्षितपणे घरी परतले. त्यांच्या परतीची पुष्टी करताना, पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी माध्यमांना माहिती दिली.






